समान नागरी संहिता (युसीसी ) लागू करण्यात आणखी विलंब झाल्यास ते आपल्या मूल्यांसाठी मारक ठरेल असे उपराष्ट्रपतींचे प्रतिपादन

 

नवी दिल्ली : समान नागरी संहिता, भारत आणि त्याचा राष्ट्रवाद अधिक प्रभावीपणे एकसंध करेल आणि "युसीसीच्या अंमलबजावणीमध्ये आणखी विलंब झाल्यास तो आपल्या मूल्यांसाठी मारक ठरेल यावर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज भर दिला. आयआयटी गुवाहाटीच्या 25 व्या दीक्षांत समारंभाला आज उपराष्ट्रपतींनी मार्गदर्शन केले. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे 'देशाच्या प्रशासनात मूलभूत आहेत' आणि त्यांचे नियम बनवणे हे राज्याचे कर्तव्य आहे यावर त्यांनी भर दिला. भारताची प्रतिमा डागाळण्याचा आणि "राष्ट्रविरोधी भूमिका बांधण्याचा वारंवार प्रयत्न होत आहे" याविरुद्ध सावधगिरी बाळगत "अशा प्रवृत्तींना प्रभावीपणे नाकारण्याची वेळ आली आहे असे ते म्हणाले."

"कोणत्याही परदेशी घटकाला आपल्या सार्वभौमत्व आणि प्रतिष्ठेशी छेडछाड करण्याची  परवानगी दिली जाऊ शकत नाही असे उपराष्ट्रपतींनी निदर्शनास आणून दिले." जागतिक शांतता आणि सौहार्दाला स्थैर्य देणारी सर्वात जुनी, सर्वात मोठी, सर्वात कार्यशील आणि चैतन्यमय लोकशाही म्हणून भारताचे वर्णन करताना, "आपण आपली समृद्ध आणि बहरणारी लोकशाही तसेच संवैधानिक संस्थांना धक्का लावू देऊ शकत नाही यावर उपराष्ट्रपतींनी भर दिला.

भ्रष्टाचाराला आता थारा नसल्याचे नमूद करून त्यांनी भ्रष्टाचारमुक्त समाज घडवण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी भारतीयत्वाचा आणि त्याच्या ऐतिहासिक कामगिरीचा अभिमान बाळगावा असे उपराष्ट्रपतींनी सांगितले.  विद्यार्थ्यांनी आर्थिक राष्ट्रवादासाठी वचनबद्ध राहावे आणि राष्ट्र तसेच राष्ट्रवादाची किंमत मोजून आर्थिक नफा मिळवण्यापासून परावृत्त व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. त्याआधी उपराष्ट्रपतींनी (डॉ.) सुदेश धनखड  यांच्यासह  गुवाहाटी येथील प्रसिद्ध माता कामाख्या मंदिराला भेट दिली आणि प्रार्थना केली. त्यानंतर त्यांनी आयआयटी गुवाहाटीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.