मागास समुदायांची परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

 

गडचिरोली : देशातील मागास समुदायाची परिस्थिती बदलण्यासोबतच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज गडचिरोली येथे केले.

गडचिरोली येथे झालेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षान्त समारंभ व अडपल्ली येथील विद्यापीठाच्या प्रस्तावित इमारतीच्या कोनशिला समारंभास राष्ट्रपतींची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत, कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे आदी यावेळी उपस्थित होते.

श्रीमती मुर्मू पुढे म्हणाल्या, गोंडवाना विद्यापीठाच्या अथक परिश्रमातून स्थानिक आदिवासी, मागास घटकांना शिक्षणाच्या माध्यमातून चांगली संधी मिळाली आहे. अतिशय कमी खर्चात उपलब्ध झालेल्या उपयुक्त शिक्षणातून याठिकाणी विद्यार्थी घडत आहेत. या विद्यापीठात चांगल्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून कौशल्यपूर्ण शिक्षण दिले जात आहे. त्याचा फायदा येथील पर्यावरण, नैसर्गिक साधनसंपत्ती व परंपरा जपण्यासाठी होईल.

या भागातील अनेक आदिवासी समूह राष्ट्रपती भवनात आपणास भेटण्यासाठी येत असल्याचे सांगून राष्ट्रपती मुर्मू पुढे म्हणाल्या. या घटकांकडून संपूर्ण देशाला शिकण्यासारखे बरेच काही आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आकांक्षित जिल्हा कार्यक्रमातून स्थानिक विकासाला चांगली चालना दिली आहे. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यांनी मुख्य प्रवाहात येण्यासाठी आपले प्रयत्न व जिद्द कायम ठेवावी. गोंडवाना विद्यापीठाचे नाव जागतिक स्तरावर जाईल याची मला खात्री आहे.

गोंडवाना विद्यापीठाची ओळख एक परिपूर्ण आदिवासी विद्यापीठ व्हावी, अशी इच्छा व्यक्त करून राज्यपाल पुढे म्हणाले,  विद्यापीठासाठी  170 एकर क्षेत्रावर येत्या काळात 1500 कोटी रूपये खर्च करून विविध पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. विद्यापीठाने गेल्या 12 वर्षात चांगली प्रगती केली आहे. 39 टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यात विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची आहे.  महाविद्यालयबाह्य असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये या विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षणाची गोडी निर्माण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, गडचिरोली  जिल्हा मागास, दुर्गम आहे. याचे कारण पायाभूत सुविधांचा अभाव होता. मात्र आता रस्ते, उद्योग, शिक्षण, आरोग्य आदी सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री व वनमंत्री यांनी या जिल्ह्यासाठी अनेक कामे मंजूर केली आहेत.  रेल्वे, विमानतळ, लोहप्रकल्प यामुळे येथे  गुंतवणूक वाढणार आहे. या सर्व प्रक्रियेत गोंडवाना विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षान्त कार्यक्रमासाठी येथे येऊन  राष्ट्रपती महोदयांनी गडचिरोली जिल्ह्याचा सन्मान वाढविला आहे. गडचिरोली जिल्हा हा जल, जंगल, जमीन आणि खनिज संपत्तीने समृद्ध आहे. या जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट प्रकारचे लोहखनिज असून 20 हजार कोटींची गुंतवणूक येथे होत आहे. या जिल्ह्याच्या विकासात गोंडवाना विद्यापीठाचेही योगदान महत्त्वाचे आहे. राज्य शासन विद्यापीठासाठी जमीन तसेच निधीची कमतरता कधीही पडू देणार नाही. गडचिरोलीत वैद्यकीय महाविद्यालय, विमानतळ, रेल्वे  आदी  सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. या माध्यमातून येथे रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल. गडचिरोली जिल्ह्याची आदिवासी संस्कृती ही आपला एक समृद्ध वारसा आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून या संस्कृतीचे जतन होऊन ती आणखी विकसित होईल. या जिल्ह्यातील नक्षलवादी चळवळ संपुष्टात येत आहे. येथील नागरिक आता मुख्य प्रवाहात येऊन जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावत आहे, असेही ते म्हणाले. प्रारंभी राज्यपाल रमेश बैस यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले.

राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक व आचार्य पदवी प्राप्त विद्यार्थी

राष्ट्रपतींच्या हस्ते अमित रामरतन गोहने (मानव विज्ञान विद्याशाखा), अर्पिता पुरुषोत्तम ठोंबरे (वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा), लोकेश श्रीराम हलामी व सदाफ नफीस अहमद अन्सारी (विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा),  संतोष प्रकाश शिंदे (आंतर विज्ञान विद्याशाखा) यांना सुवर्णपदक तर सारिका बाबुराव मंथनवार यांना शिक्षणशास्त्र या विषयात आचार्य पदवी प्रदान करण्यात आली.