पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी ‘केवाय’ ही नवीन मालिका सुरु

 

पुणे : पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी ‘केवाय’ ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांक दुचाकींसाठी ठेवण्याबाबत आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित तीनपट शुल्क भरून हवे असतील अशा चारचाकी वाहन मालकांनी १३ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा. दुचाकी मालिकेतील उर्वरित आकर्षक नोंदणी क्रमांक दुचाकी वाहनांसाठी आरक्षित करण्यासाठी १४ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० वा. विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा.

अर्ज कार्यालयाच्या नवीन वाहन नोंदणी विभागात धनाकर्ष (डीडी), पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह आधारकार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकासह जमा करावा. हा डीडी ‘डी.वाय.आर.टी.ओ., पिंपरी चिंचवड’ यांच्या नावे राष्ट्रीयकृत, अनूसचित बँकेचा पुणे येथील असावा. अर्जदाराने ओळख पटविण्यासाठी अर्जासोबत फोटो ओळखपत्र तसेच पत्त्याच्या पुराव्यासाठी आधारकार्ड, दूरध्वनी देयक आदींची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे.

चारचाकी वाहनांसाठी क्रमांकांची यादी १४ जुलै रोजी सकाळी कार्यालयीन सूचना फलकावर लावण्यात येईल. यादीतील अर्जदारांना लिलावासाठी जास्त रकमेचा डीडी जमा करावयाचा असल्यास १४ जुलै रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा. त्याच त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कक्षात नोंदणी प्राधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संबंधीत अर्जदारांसमोर लिफाफे उघडून विनिर्दीष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्या अर्जदारास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाणार आहे.

दुचाकीची यादी १७ जुलै रोजी कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. दुचाकीसाठी अर्जदारांना लिलावाकरीता जास्त रकमेचा डीडी जमा करावयाचा असल्यास १७ जुलै रोजी दुपारी २.३० पर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा. त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कक्षात नोंदणी प्राधिकारी यांच्या उपस्थितीत लिफाफे उघडून जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केलेल्या अर्जदारास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाणार आहे. वाहन क्रमांक आरक्षित केल्याचे संदेश मोबाईलवर आल्यानंतर पाचव्या दिवशी पावती कार्यालयातून मिळणार आहे.

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व शुल्क सरकारजमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क परत करता येणार नाही. आकर्षक क्रमांकाचे शुल्कामध्ये बदल झाल्यास त्याप्रमाणे विहीत केलेले शुल्क लागू करण्यात येणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.