दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी ‘एआय तंत्रज्ञान’ उपयुक्त – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबई : स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे औषधनिर्माण विभागाचे प्राध्यापक डॉ. अनुराग मैरल यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट घेतली. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन राज्याच्या आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी डॉ. मैरल यांनी यावेळी दर्शविली.

राज्यभरातील नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य संस्थांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यात सुमारे ७०० बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येत आहेत. आपला दवाखान्यातील सुविधांसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केल्यास नागरिकांना घराजवळच दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होईल शकतील. त्यामुळे मोठ्या रुग्णालयांमध्ये होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन होऊ शकेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा पोहचविण्यासाठी एआय तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. डॉ. मैरल हे स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या ग्लोबल आऊटरिच प्रोग्रामचे संचालक असून मुख्यमंत्री आणि डॉ. मैरल यांच्यात वैद्यकीय क्षेत्र, औषधनिर्मितीसह सामान्य जनतेला आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे दर्जेदार, अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा पुरविण्याच्या विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली.