पाच देशांच्या ब्रिक्स संघटनेचा विस्तार करुन आणखी ६ देशांचा समावेश करण्याचा दक्षिण आफ्रिकेत झालेल्या परिषेदत निर्णय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पाच देशांच्या ब्रिक्स संघटनेचा विस्तार करण्याचा निर्णय दक्षिण आफ्रिकेत आयोजित तीन दिवसीय ब्रिक्स परिषदेत झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. अर्जेंटिना, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात हे देशही आता ब्रिक्सचे पूर्ण सदस्य होणार आहेत. ब्रिक्स परिषदेच्या अनुषंगानं जोहान्सबर्गमधेच आज आयोजित ब्रिक्स -आफ्रिका आऊटरिच, आणि ब्रिक्स प्लस डायलॉग या कार्यक्रमात बोलताना मोदी यांनी सांगितलं की, ब्रिक्सच्या विस्ताराला भारताचा नेहमीत पाठिंबा राहिला आहे, आणि नवे सदस्य या संघटनेला मजबूत करतील, असा भारताला विश्वास आहे. या सर्व देशांशी भारताचे नेहमीच घनिष्ठ संबंध राहिले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. त्याआधी दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी या १५ व्या ब्रिक्स परिषदेच्या फलनिष्पत्तीची घोषणा केली. ब्रिक्सच्या संपूर्ण सदस्यत्वासाठी नव्या सहाही देशांना निमंत्रित करण्याबाबत या परिषदेत सहमती झाली. या देशांचं सदस्यत्व जानेवारी-२०२४ पासून जारी होईल, असं त्यांनी सांगितलं.