सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षांना नामोहरम करण्याचं काम भाजपा करत असल्याचा शरद पवार यांचा आरोप
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षांना नामोहरम करण्याचं काम भाजपा करत आहे, याविरोधात आम्ही एकजुटीनं काम करणार आहोत, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज कोल्हापुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते. काही आमदार बाहेर पडले म्हणजे पक्ष फुटला असं नव्हे, असं ते म्हणाले. पक्षात नवीन नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या तीन सभांना तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ही सकारात्मक सुरुवात असल्याचं पवार म्हणाले.
सत्तेवर असलेल्या भाजपाकडून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याविरोधात 'इंडिया' आघाडी म्हणून आम्ही एकत्र येणार आहोत, असं त्यांनी सांगितलं. 'इंडिया' आघाडीची बैठक ३० ऑगस्ट आणि १ सप्टेंबर या दोन्ही दिवशी मुंबईत होणार आहे. या बैठकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नसलेल्या पक्षांचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. देशभरातल्या १६ प्रादेशिक पक्षांचे अध्यक्षही या बैठकीला हजर राहणार आहेत, असं त्यांनी सांगितलं. राज्यभरात पावसानं ओढ दिल्यानं तोंडाशी आलेली पिकं करपत आहेत, आतापर्यंत पंचनामे सुरू करायला हवे होते, पण सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर नसल्याचं दिसतं, अशी टीका शरद पवार यांनी केली.
मणिपूरमध्ये हिंसा घडतेय. या राज्याला लागून असलेल्या मिझोरामसह अन्य राजांच्या सीमा चीनशी जोडल्या गेल्या आहेत. चीनच्या जवळ असलेल्या या राज्यांमध्ये अशांतता असणं ही गंभीर बाब आहे. याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना यांना विनंती केली होती. मात्र केंद्र सरकार सीमा सुरक्षेबाबत गंभीर नाही, आसा आरोप त्यांनी केला. १५ सप्टेंबरनंतर साखर निर्यात न करण्याचे केंद्राचं धोरण आहे. यानंतर जागतिक बाजारपेठेतील साखरेचे दर कमी होतील, असा अंदाज पवार यांनी बातमीदारांशी बोलताना व्यक्त केला.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.