'माझा गणेशोत्सव माझा मताधिकार' देखावा-सजावट स्पर्धेचे आयोजन

 

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी स्पर्धेत सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे आवाहन

पुणे : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी 'माझा गणेशोत्सव माझा मताधिकार' गणेशोत्सव देखावा-सजावट २०२३ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

दरवर्षी भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला महाराष्ट्रातील गणेश भक्तांच्या घरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मडळामध्ये गणेशाचे आगमन होते. याचाच एक भाग म्हणून राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने 'माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ या विषयासंबंधी गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे.

गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळे प्रबोधनपर देखावे साकार करून सामाजिक संदेश देतात. या स्पर्धेत मंडळांना देखावे व सजावटीद्वारे नागरिकांना मताधिकार बजावण्यासाठी मतदार नोंदणी, मताधिकार, लोकशाहीचे सक्षमीकरण आदी विषयावर प्रबोधन करता येईल. देखावे सजावटीसाठी ‘लोकशाही टिकवण्यासाठी मतदानाला पर्याय नाही!’, ‘मतदार यादीतला तरुणाईचा टक्का वाढावा म्हणून जनजागृती’, ‘आम्ही मतदान करणार कारण..’, ‘हक्क वंचितांचे मार्ग मताधिकाराचा’ आणि ‘शहरी मतदाराची अनास्था कारणे आणि उपाय’ आदी विषय घेता येतील.

याव्यतिरिक्त लोकशाही मतदार नोंदणी, मताधिकार यांचे महत्त्व अधोरेखित करुन मताधिकार हा १८ वर्षांवरील नागिराकाचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवणे, मताधिकार बजावणे, मतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडणे, मताधिकार बजावताना जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषाना बळी न पडता मताधिकार बजावणे यांसारख्या विषयावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना देखावा-सजावटीतून जागृती करून लोकशाही समृद्ध करता येईल.

पाणी, सार्वजनिक स्वच्छता, खड्डेमुक्त रस्ते, चांगले शिक्षण व चागली घरे अशा अनेक सार्वजनिक सुविधा सर्व नागरिकाना विनासायास प्राप्त होणे हे सक्षम आणि सुदृढ लोकशाहीच लक्षण आहे. मात्र नागरिकाना या सुविधाची केवळ माहिती असून उपयोग नाही, तर या सुविधा मिळवून देण्याची जबाबदारी आपल्या लोकप्रतिनिधींवर आहे आणि ती पार पाडणाऱ्या लोकप्रतिनिधीची निवड करणेही तितकेच आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने कोणत्याही आमिषाना बळी न पडता आपल्या परिसराच्या कायमस्वरूपी विकासाला प्राधान्य देऊन मताधिकार बजावला पाहिजे. अशा सुजाण नागरिकांनी बजावलेल्या मताधिकारामुळेच लोकांनी लोकांची लोकासाठी चालवलेली लोकशाही व्यवस्था अस्तित्वात येईल. यासारखे संदेशही देखावे व सजावटीच्या माध्यमातून देता येतील.

बक्षिसांचे स्वरुप: प्रथम क्रमांकास १ लाख रुपये, द्वितीय क्रमांकास ५१ हजार रुपये, तृतीय क्रमांकास २१ हजार रुपये तर उत्तेजनार्थ बक्षिसे १० हजार रुपयांची एकूण १० बक्षिसे राहतील.

स्पर्धेसाठी गूगल अर्ज आणि काही तांत्रिक नियमावली नंतर कळविण्यात येणार आहे. स्पर्धकांच्या संख्येनुसार आणि दर्जानुसार बक्षिसाच्या संख्येत आणि रकमेत बदल करण्याचा अधिकार आयोजक आणि परीक्षकांचा राहील, असेही उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती मीनल कळसकर यांनी कळविले आहे.