आपत्ती व्यवस्थापनातून दुष्काळग्रस्त भागाला अधिक मदत करण्यासाठी केंद्र शासनाकडे सहकार्याची राज्य सरकारची मागणी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आपत्ती व्यवस्थापनातून दुष्काळग्रस्त भागाला अधिक मदत करण्यासाठी केंद्र शासनानं सहकार्य करावं, त्यासाठी उपाययोजना आखाव्यात अशी मागणी, मदत, पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी काल दिल्लीत सीतारामन यांची भेट घेतली. दुष्काळग्रस्त भागासाठी आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत काय उपाययोजना करता येऊ शकतात याबाबत यावेळी चर्चा झाल्याचं या भेटीनंतर पाटील यांनी  सांगितलं. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची, तसंच यासंदर्भात राज्याकडून केंद्र शासनाला प्रस्ताव पाठव‍णार असल्याची माहिती त्यांनी दिली. पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळण्याबाबत येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन आवश्यकतेनुसार केंद्राच्या निकषात बदल करून ते शिथील करावेत, अशी मागणी केंद्रीय गृह मंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे करणार असल्याचही पाटील यांनी सांगितलं.