डॉ. आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड -२३ सह चार नव्या ग्रंथाचे प्रकाशन

चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे दोन वर्षांत १८ ग्रंथ प्रकाशित

मुंबई : डॉ. आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड २३ (इंग्रजी) , जनता  ३-३, जनता खास अंक १९३३ आणि इंग्रजी खंड २ चा मराठी अनुवाद (भाग १ व २)  या नवीन ग्रंथांचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या या प्रकाशनप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह, मंत्रिमंडळातील सदस्य मंत्री, समितीचे सदस्य उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, शिक्षण संचालक डॉ. शैलेश देवळाणकर, सदस्य माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. संभाजी बिरांजे, डॉ. बबन जोगदंड, डॉ. सुरेंद्र धाकतोडे, ज. वि. पवार, योगीराज बागूल, रुपेंद्र मोरे, सिद्धार्थ खरात, आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या कामाचे कौतुक केले.

याच कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड ४, खंड १२, खंड १५, खंड १७ (तीन भाग), खंड १८ (तीन भाग), आणि जातीव्यवस्थेचे निर्मूलन या ग्रंथांच्या नव्या आवृत्तींचे प्रकाशन करण्यात आले.

डॉ. आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड २३ विषयी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने आतापर्यंत डॉ. आंबेडकर लेखन आणि भाषणाचे २२ खंड प्रकाशित झाले असून २३ वा खंड हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘एम. एससी.’ च्या पदवीकरिता सादर करण्यात आलेल्या प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ फायनान्स इन ब्रिटिश इंडिया (‘Provincial Decentralization of Imperial Finance in British India’) या शोधप्रबंधाविषयी आहे. हा शोध प्रबंध ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ ला १९२१ मध्ये सादर केला होता. हा शोध प्रबंध तब्बल १०० वर्षानंतर प्रकाशन समितीला नोव्हेंबर २०२१ मध्ये लंडनच्या सिनेट ग्रंथालयाकडून  प्राप्त झाला.

या खंड २३ चे दोन भाग करण्यात आले आहे. पहिल्या भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘एम. एससी.’ चा  प्रबंध आहे, तर दुसऱ्या भागात डॉ. आंबेडकर यांच्या उच्च शिक्षणाबाबतचा दुर्मिळ दस्तऐवज आणि पत्रव्यवहार दिला आहे. त्यामध्ये ‘एम.ए.’ आणि ‘पीएच. डी.’,  ‘एम. एससी.’, ‘डी.एससी.’ ‘एलएल. डी.’ च्या संदर्भातील दस्तावेज आणि पत्रव्यवहार आहे. अमेरिकेतील उच्च शिक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महाराज सयाजीराव गायकवाड यांनी शिष्यवृत्ती दिली होती. त्यांचे ऋण फेडण्यासाठी त्यांनी त्यांचे चरित्र लिहिण्याचे ठरविले होते. त्यासंदर्भात त्यांनी  बडोद्याचे महाराज प्रतापसिंग यांना १० ऑक्टोबर १९५० रोजी पत्र लिहिलेले पत्र देखील या खंडात आहे.

जनता ३-३ या खंडात ‘जनता’ पत्राच्या १० डिसेंबर १९३२ ते २ डिसेंबर १९३३ पर्यंतच्या अंकांचा  समावेश  आहे.

जनता खास अंक, १९३३ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मादिनानिमित्त ‘जनता’ ने एप्रिल १९३३ रोजी जनताचा खास अंक प्रकाशित केला होता. इंग्रजी खंड २ चा मराठी अनुवाद या ग्रंथात मुंबई विधीमंडळातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, सायमन आयोगाला सादर केलेल्या शिफारशी  आणि गोलमेज परिषदेतील भाषणे आणि इतर कामकाजाचा समावेश आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रकाशित आणि अप्रकाशित साहित्य प्रकाशित करून ते सर्व सामांन्यापर्यंत पोहचले पाहिजे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने १५ मार्च १९७६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र  साधने प्रकाशन समितीची स्थापना केली. या समितीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर: लेखन व भाषणे (Dr. Babasaheb  Ambekar  Writing and Speeches) चे एकूण २२ खंड प्रकाशित केले आहेत, या २२ खंडांपैकी १ ते १७ हे इंग्रजी भाषेत आहेत. तर १८,१९ आणि २० हे मराठीत आहेत. २१ वा खंड हा पत्रांचा आहे. तर २२ खंड हा डॉ. आंबेडकरांच्या छायाचित्रांचा संग्रह (अल्बम) आहे. आता २३ वा खंड प्रकाशित झाला आहे. या व्यतिरिक्त सोर्स मटेरियल (Source Material)  चे ३ खंड आणि २ पुस्तिका प्रकाशित करण्यात आले आहेत.

याशिवाय समितीने फेब्रुवारी २०२४ इंग्रजी खंड ३, इंग्रजी खंड ४ आणि इंग्रजी खंड ९ चा मराठी अनुवाद तसेच जनता खंड क्र. ३- ४, जनता खंड क्र. ३- ५, जनता खंड क्र. ३-६ चे प्रकाशन करण्याचे नियोजन केल्याची माहिती समितीचे सचिव डॉ. आगलावे यांनी दिली.

 

Popular posts
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image