केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते गुजरातमधील वापी येथे 12 जीएसटी सेवा केंद्रांचे उदघाटन
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज गुजरातच्या वापी येथील ज्ञानधाम विद्यालयात 12 वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) सेवा केंद्रांचे उदघाटन केले.
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मेरा बिल मेरा अधिकार योजनेत सहभागी झालेल्या 6 ग्राहकांना 10 लाख रुपयांच्या धनादेशासह बक्षिसेही वितरित केली. विजेत्यांनी खरेदी केल्यानंतर त्यांची वैध जीएसटी बिले अॅपवर अपलोड केली होती.
ही अत्याधुनिक केंद्रे देशातील व्यवसाय सुलभता वाढविण्यात मदत करतील असा विश्वास अर्थमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. अशी केंद्रे स्थापन करण्यात गुजरातने पुढाकार घेतल्याबद्दल अभिनंदन करताना, इतर राज्यांसाठी ते एक आदर्श ठरेल असे अर्थमंत्र्यांनी नमूद केले. यावेळी गुजरातचे अर्थमंत्री कनुभाई देसाई, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे (सीबीआयसी) अध्यक्ष संजय कुमार अग्रवाल यांच्यासह जीएसटी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
देशातील सामान्य नागरिक खरेदी करताना व्यापारी किंवा दुकानदाराकडून बिल मागून देशाच्या विकासात मोलाचे योगदान देऊ शकतो असे मत मेरा बिल मेरा अधिकार योजनेबाबत त्यांनी मांडले. अर्थमंत्र्यांनी सांगितले कि बिल घेणे हा ग्राहकाचा अधिकार असून बिल देणे हे व्यापारी-दुकानदाराचे कर्तव्य आहे.
अर्थमंत्र्यांनी सांगितले की, अशा प्रोत्साहनांमुळे अधिकाधिक लोकांना बिल घेण्यास आणि योजनेत सहभागी होण्यासाठी पोर्टलवर बिले अपलोड करण्यास प्रोत्साहन मिळेल.
मेरा बिल मेरा अधिकार (MBMA) ही योजना सीबीआयसीने 1 सप्टेंबर 2023 रोजी विक्री खरेदी व्यवहारादरम्यान बिले/चलन तयार करण्याच्या संस्कृतीला चालना देण्यासाठी सुरू केली होती.
राज्याचे अर्थमंत्री .कनुभाई देसाई यांनी दिवाळीनिमित्त वापीला जीएसटी सेवा केंद्राची भेट दिल्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्र्यांचे आभार मानले आणि म्हणाले की, जीएसटी लागू झाला तेव्हा अनेक चिंता व्यक्त केल्या गेल्या होत्या परंतु प्रत्येक राज्यातील जीएसटी परिषदेच्या सर्व सदस्यांचे मत विचारात घेऊन केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जीएसटी परिषदेच्या अध्यक्ष या नात्याने जनतेच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले आहे.
आज उघडलेली 12 जीएसटी सेवा केंद्रे अहमदाबाद, वडोदरा, सुरत, गोध्रा, वापी, मेहसाणा, पालनपूर, गांधीनगर, राजकोट, भावनगर, जुनागढ आणि गांधीधाम येथे आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.