राज्यातल्या काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस

 

मुंबई (वृत्तसंस्था) : सांगली जिल्ह्यात आज मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला. हा पाऊस स्थानिक शेतकऱ्यांच्या ज्वारी, हरभरा ,गहू या  पिकांसाठी  उपयुक्त ठरणार आहे. सातारा जिल्ह्यातल्या माण, सातारा आणि पाटण तालुक्यातल्या काही भागांनाही आज पावसानं झोडपून काढलं.

सोलापूर शहरासह जिल्ह्यातल्या  मंगळवेढा,  पंढरपूर,  सोलापूर,  मोहोळ, माढा आणि  करमाळा या भागात काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत मुसळधार पाऊस पडला. जिल्ह्यात  ज्वारीच्या पेरण्या  उरकल्या असून हा पाऊस त्या पिकासाठी दिलासादायक ठरणार असल्यानं शेतकरी वर्ग  समाधान व्यक्त करत आहे.

लातूर शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागात अवकाळी पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी पडल्या. तर चाकूर आणि उदगीर शहर आणि तालुक्यातल्या अनेक गावांत जोरदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे, शेतकऱ्यांनी रास करून ठेवलेल्या पिकांचं काही अंशी नुकसान झालं आहे.