आनंदाचा शिधा वाटपाचा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून आढावा
• महेश आनंदा लोंढे
पुणे : राज्य शासनामार्फत दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्यास सुरूवात झाली असून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी काळेपडळ- हडपसर येथील स्वस्त धान्य दुकानाला भेट देऊन शिधा वाटपाचा आढावा घेतला. सर्व शिधापत्रिकाधारकांना दिवाळीपूर्वी आनंदाचा शिधा देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी अन्नधान्य वितरण अधिकारी दादासाहेब गिते, परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे, पुरवठा निरीक्षक कृष्णा जाधवर यांच्यासह स्वस्त धान्य दुकानदार आदी उपस्थित होते.
पुणे शहर व जिल्ह्यात सर्व स्वस्त धान्य दुकानांमध्ये आनंदाचा शिधा पोहोचविण्यात येत असून असून वाटपाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. नियमित धान्यासोबतच हा शिधाही शिधापत्रिकाधारकांनी न्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. देशमुख यांनी केले आहे.
पूर्वी आनंदाचा शिधा या संचात रवा, चनाडाळ, साखर आणि खाद्यतेल असे ४ जिन्नस होते. मात्र राज्य शासनाने आता यामध्ये मैदा आणि पोहे अशा दोन जिन्नसांची नव्याने समावेश केला आहे. १ किलो साखर, १ लिटर खाद्यतेल तसेच प्रत्येकी अर्धा किलो रवा, चनाडाळ, मैदा आणि पोहे असे आनंदाचा शिधाचे स्वरुप आहे. अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे.
आनंदाचा शिधाअंतर्गत पुणे ग्रामीणमध्ये आंबेगाव तालुक्यात ४५ हजार शिधा संचांचे, बारामती ८४ हजार ५००, भोर २७ हजार, दौंड २७ हजार ३००, केडगाव २६ हजार, हवेली २२ हजार ५००, इंदापूर ६८ हजार ३००, जुन्नर ६६ हजार ५४९, खेड ५९ हजार १००, मावळ ३७ हजार, मुळशी १८ हजार ५००, शिरुर २० हजार ९००, तळेगाव ढमढेरे २८ हजार ५००, वेल्हे ७ हजार ८०० असे एकूण ५ लाख ७६ हजार ९४९ शिधा संचांचे वाटप करण्यात येणार आहे. अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकूण ३ लाख २३ हजार ४५६ शिधा संचांचे वाटप करण्यात येणार आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.