लोकसभा सुरक्षा उल्लंघनाच्या मुद्द्यावरून लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभा सुरक्षा उल्लंघनाच्या मुद्द्यावरून वारंवार गदारोळ झाल्यामुळे आज लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करायला लागलं. लोकसभेचं कामकाज सुरू होताच काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, संयुक्त जनता दल आणि इतर विरोधी पक्ष सदस्यांनी हौद्यात उतरून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. त्यांनी विरोधी पक्षांच्या सदस्यांच्या निलंबनाचाही निषेध केला. या मुद्द्यावर गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं आणि चर्चा घ्यावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. हेच चित्र राज्यसभेतही बघायला मिळालं.

सुरक्षेच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष सदस्यांनी मांडलेले स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि त्यातून योग्य तो निष्कर्ष निघेल असं धनखड यांनी सांगितलं. विरोधी पक्षांनी या प्रकरणी सरकारच्या निवेदनाची मागणी केली. त्यानंतर धनखड यांनी सभागृह नेते, विरोधी पक्षनेते यांना त्यांच्या कक्षात बोलावलं. गदारोळातच कामकाज दुपारी दोनपर्यंत तहकूब करण्यात आलं. दरम्यान विरोधी पक्षांच्या निलंबित संसद सदस्यांनी त्यांचं निलंबन मागे घेतलं जावं या मागणीसाठी आज संसद भवन परिसरातल्या महात्मा गांधी पुतळ्यासमोर सकाळी निदर्शनं केली.