लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करा - जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे
• महेश आनंदा लोंढे
पुणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक शांततेच्या वातावरणात आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सुरक्षेच्यादृष्टीने खबरदारीच्या उपाययोजनांवर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले. सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम केल्यास निवडणुका मुक्त वातावरणात पार पडतील, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेबाबत दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, तर दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
डॉ.दिवसे म्हणाले, सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत संबंधित विभागांतर्गत आणि विविध विभागातही माहितीचे आदानप्रदान नियमितपणे करावे. मागील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जमा केलेली शस्त्रे, दाखल झालेले निवडणूक विषयक गुन्हे, गुन्हे दाखल झालेले व्यक्ती आदींची माहिती तयार ठेवावी आणि या माहितीचे विश्लेषण करून अशा गुन्ह्यांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कार्यवाही करावी. गंभीर गुन्हे घडलेल्या भागात पोलीस व महसूल अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे भेटी द्याव्यात, आवश्यक ठिकाणी प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी.
अतिसंवेदनशील आणि संवेदनशील मतदान केंद्रात नागरिकांना शांततेत आणि निर्भयपणे मतदान करता यावे यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय आतापासूनच योजावे. कायदा व सुव्यवस्थेसंदर्भातील सर्व अहवाल त्वरीत सादर करावे. निवडणुकीत कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही यादृष्टीने यंत्रणेची सज्जता असावी, त्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पोलिस अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करावे, असेही ते म्हणाले.
राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक संपन्न लोकसभा निवडणूकविषयक पूर्वतयारीची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी तहसीलदार शीतल मुळे, राहुल सारंग आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघातील १२१ मतदान केंद्रांवर १ हजार ५०० पेक्षा अधिक मतदार असल्याने सहाय्यकारी मतदान केंद्र स्थापनेबाबत कार्यवाही सुरू आहे. मतदार यादी शुद्धीकरण आणि मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. मागील सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी राज्याच्या सरासरी टक्केवारीपेक्षा कमी असल्याने राजकीय पक्षांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती उपक्रमात सहकार्य करावे आणि मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची नेमणूक लवकर करावी, असे आवाहन श्री.सारंग यांनी केले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.