शिवनेरी येथे १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन
• महेश आनंदा लोंढे
महोत्सवाला शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, पर्यटक आणि सर्व नागरिकांनी भेट द्यावी - पर्यटन मंत्री गिरीश महाजन
पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात १७ ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त राज्याचा पर्यटन विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्यावतीने जुन्नर येथे 'हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४'चे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाला शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, पर्यटक आणि सर्व नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
तीन दिवस होणाऱ्या या महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती, समृद्ध इतिहासाला उजाळा मिळणार आहे. इतिहासाची साक्ष देणाऱ्या जुन्नर शहरात तीन दिवस कला, संगीत, साहस आणि अध्यात्मविषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
शिवनेरी फेस्टिवल २०२४ मध्ये विविध उपक्रम महोत्सवात पारंपरिक संगीत, नृत्य आणि नाट्य यांचा समावेश असेलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. हस्तकला प्रदर्शन, चवदार आणि मनमोहक अशा पाककृती, कार्यशाळा, क्वाड बायकिंग, पेंटबॉल, तिरंदाजी, गिर्यारोहण, रॅपलिंग, झिपलायनिंग, स्पीड बोटींग, वॉल क्लायबिंग अशा साहसी खेळांचा अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे.
कुकडेश्वर मंदिर, नागेश्वर मंदिर, हरिश्चंद्रेश्वर मंदिर, काशी ब्रह्मनाथ मंदिर, अष्टविनायक मंदिर, लेण्याद्री मंदिर, ओझर मंदिर, ज्योतिर्लिंग मंदिर, भीमाशंकर मंदिर आणि त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन, निरभ्र रात्री लेकसाईड ग्लँपिंग आणि स्टारगेझिंगचा आनंददेखील अनुभवता येणार आहेत. किल्ले हडसर, निमगिरी - हनुमंतगड, नाणेघाटासोबत जिवधनगड, कुकडेश्वर मंदिरासोबत चावंडगड अशा ठिकाणची आव्हानात्मक चढाई, दोन दिवसीय गिर्यारोहण आणि कँपिंगसोबत हरिश्चंद्रगड ट्रेक आणि हडपसर - निमगिरी - हनुमंतगड - नाणेघाट - जिवधन येथे गिर्यारोहण हा उपक्रमदेखील आयोजित करण्यात आला आहे.
सांस्कृतिक कार्यक्रम व विविध बचतगटांचे प्रदर्शन या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून हे सर्व कार्यक्रम जुन्नर तालुक्यातील शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय मैदान येथे होणार आहेत. १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान सकाळी १० ते रात्री ९ विविध बचत गटांची उत्पादने व खाद्यपदार्थांची दालने असेल. १७ फेब्रुवारी रोजी सायं. ६:३० ते ७:३० वा. छत्रपतींची मानवंदना शाहीर सुरेश जाधव यांचा पोवाडा पर कार्यक्रम, सायं. ७:३० ते रात्री ९.३० वा. ‘जाणता राजा’ महानाट्याचे आयोजन असेल.
दुसऱ्या दिवशी १८ फेब्रुवारी रोजी सायं. ६:३० ते ७:३० वा. गर्जा महाराष्ट्र माझा ही नृत्य नाटिका, सायंकाळी ७:३० ते रात्री ९.३० वा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचे दर्शन घडवणारा गनिमी कावा हा कार्यक्रम होईल.
शिवजयंती दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ११ शिवजन्मोत्सव सोहळा, सायं. ६:१५ ते ७ वा. महा शिवआरती कार्यक्रम, सायं. ६.३० ते ७:३० वारी सोहळा संताचा (नृत्य) आणि सायं ८:३० ते ९.३० वा. शिवशंभु शौर्यगाथा-शिव सह्याद्री (महानाट्य) या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.