जगातील पहिली एअर टॅक्सी दुबईत

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शहरी वाहतुकीमध्ये क्रांती घडवण्याच्या उद्देशाने, दुबईने वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट २०२४ मध्ये जगातली पहिली हवाई टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठीचा करार केला आहे. या करारामुळे संपूर्ण दुबई शहरात इलेक्ट्रिक हवाई टॅक्सी आणि व्हर्टीपोर्ट नेटवर्क सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या सेवेसाठी सुरुवातीला ‘जॉबी एव्हिएशन S4’ या  नाविन्यपूर्ण विमानाला परवाना मिळाला असून,  पायलट व्यतिरिक्त चार प्रवाशांना सामावून घेण्याची या विमानाची क्षमता आहे.  कार्यक्षमता, सुरक्षितता आणि शाश्वतता, याबरोबर हवाई टॅक्सी सेवेमुळे ध्वनी प्रदूषणाच्या पातळीत घट, कमी कार्बन उत्सर्जन आणि प्रवाशांची सोय, असे  फायदे मिळतील. दुबई मधली हवाई टॅक्सी सेवा २०२६ पासून कार्यरत होणार असून, हा उपक्रम भविष्यातल्या अधिक शाश्वत आणि सहज उपलब्ध परिवहन सेवेच्या दिशेने महत्वाचं पाऊल ठरेल असं अंदाज आहे.