मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या मदतीने मुंबईच्या विकासाला अधिक गती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई : मेगापॉलिस मेटाव्हर्स प्रकल्पाच्या मदतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबईच्या विकासाला अधिक गती देण्यात येत आहे. मुंबईत सुरु असलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प आणि डिजिटल प्रकल्पाद्वारे सन 2025 पर्यंत मुंबईचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि मुंबई मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या सहकार्यातून स्वप्नातील मुंबई साकार करणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे पर्यटन विभाग, सिडको, मुंबई महापालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई मेट्रो आणि मुंबई मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या माध्यमातून आयोजित मुंबई टेक विक कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्कचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, हंगामा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज रॉय, गोकीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल गोंदाल, ड्रीम इलेव्हनचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्ष जैन, बुक माय शोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष हेमरजानी आणि हाबटेकचे अक्रीत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी लोकमतचे संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची मुंबईच्या विकासाबाबत मुलाखत घेतली. श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबईमध्ये कोस्टल रोड, मेट्रोसह पायाभूत सुविधांचे विविध प्रकल्प सुरु आहेत. मुंबई बदलत आहे, याचा नागरिकांना अनुभव येत आहे. शहरातील वाहतूक आणि प्रदूषण समस्याही दूर करण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. कोस्टल रोडचे काम पूर्णत्वास आले असून पुढील महिन्यात नागरिकांच्या सेवेसाठी सुरू होईल. मुंबईला बदलण्यासाठी मेट्रो तीन प्रकल्प आणि सर्वात लांब भुयारी मेट्रोही प्रगतीपथावर आहे. प्रत्येक मुंबईकराला भविष्यातील मुंबई पाहून आनंद वाटेल. ऑक्टोबरमध्ये नवी मुंबई विमानतळाच्या माध्यमातून चार प्रकल्प लवकरच सुरु होतील. 2014 मध्ये मुख्यमंत्री  झाल्यानंतर उद्योगपतींची बैठक घेतली होती. त्यामुळे अनेक उद्योग मुंबईत आले आता मात्र मुंबईत उद्योगांसाठी जागा अपुरी पडत आहे. मुंबईत अपुऱ्या जागेमुळे नवीन महामार्ग बनवू शकत नसल्याने मेट्रोचे जाळे तयार करीत आहोत.

अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा-शेवा अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई जोडण्याचे काम झाले असून कमी वेळात वेगाने पोहोचता येत आहे. नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढत असून तिसरी मुंबई तयार होत आहे. कोस्टल रोडसुद्धा अटल सेतूला जोडला गेल्याने नवी मुंबईचे अंतर कमी झाले आहे. अटल सेतू, कोस्टल रोड, कॉरिडॉर, भुयारी मेट्रो, टनेल यामुळे मुंबईतून एका तासात कुठेही जाता येणार असल्याचा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला. सध्या 11 किमी भुयारी मेट्रो आहे, ती पुढील तीन वर्षात 375 किमी करण्याचा प्रयत्न आहे. पुढच्या पाच वर्षात मुंबईचा चेहरामोहरा बदलण्यासाठी विकास कामे सुरू आहेत.

डेटा सेंटर, तंत्रज्ञानामुळे महाराष्ट्रात युवकांना रोजगार

स्टार्ट अप आणि इको सिस्टीममुळे युवक बंगळुरू, हैदराबादकडे जात होते. आता महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर येथे स्टार्टअप कार्यान्वित केले आहे. 2016 ला देशाला आकर्षित करेल अशी स्टार्टअप पॉलिसी राज्याने तयार केली. शिवाय अत्याधुनिक तंत्रज्ञान, डेटा सेंटर तयार करीत आहे. अॅमेझॉन, गुगल या कंपन्यांशी गुंतवणुकीबाबत चर्चा झाली आहे. गुगलशी पुण्यात सामंजस्य करार झाला आहे. पुणे वेगाने तंत्रज्ञान शहर बनत असून नागपूर, पुणे, मुंबईत तंत्रज्ञान कंपन्या गुंतवणूक करण्यास पुढे आल्या आहेत. यामुळे महाराष्ट्राचा युवक इतर राज्यात नोकरीला जाणार नाही, असा विश्वासही श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.   

2028 मध्ये एक ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था

राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढत असल्याने येत्या 2028-29 मध्ये देशाच्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी राज्याचा एक ट्रिलियन डॉलरचा हिस्सा असणार आहे. यासाठी नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘मित्रा’ द्वारे काम सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यात गुंतवणूक येण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

राज्य शासनात तंत्रज्ञाचा वापर

चांगल्या आणि पारदर्शी सरकारसाठी तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञाचा आणि एआयचा वापर शासनामध्ये होत आहे. सामान्य नागरिकांना निधीचे वाटप, योजनेचा लाभ, विद्यार्थी शिष्यवृत्ती डीबीटीमार्फत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत आहे. यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला असून 300 शासकीय योजना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणल्याची माहितीही त्यांनी दिली.

कौस्तुभ धवसे आणि नीरज रॉय यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या पायाभूत सुविधांचे विविध प्रकल्प लॉन्च करून प्रकल्पांचे क्यू आर कोडही स्कॅन केले.

Popular posts
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image