भाजपा सरकार देशाच्या विकास कार्याला प्रतिबद्ध - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचा भरभराटीचा काळ आला असून भाजपा सरकार विकास कार्याला प्रतिबद्ध असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. विकसित भारत विकसित राजस्थान कार्यक्रमात, राजस्थानातल्या १७ हजार कोटी रुपये खर्चाच्या योजनांची पायाभरणी आणि लोकार्पण दूरदृष्यप्रणालीद्वारे केल्यानंतर ते बोलत होते. डबल इंजिन सरकारमुळे विकासाचा वेग वाढल्याचं त्यांनी सांगितलं. यापूर्वीच्या सरकारच्या निराशाजनक काळानंतर आता आशावादी आणि सकारात्मक वातावरण राजस्थानात आणि देशभरात पहायला मिळतं असं ते म्हणाले. घरोघरी सौर उर्जा निर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या सौर घर उर्जा योजनेचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. आज सुरु होत असलेल्या विविध योजनांमधून पायाभूत सुविधा विकास होण्याबरोबरच रोजगारालाही चालना मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला. 

या कार्यक्रमात महामार्ग, रेल्वे, सौरऊर्जा, विद्युत पारेषण, पेयजल, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यांसह विविध महत्त्वपूर्ण योजनांचा समावेश होता. हा कार्यक्रम राजस्थानच्या सर्व जिल्ह्यांमध्ये दोनशे ठिकाणी आयोजित करण्यात आला होता तर मुख्य कार्यक्रम जयपूरमध्ये झाला. राजस्थानातल्या राजकीय नेत्यांसह शासकीय योजनांचे लाखो लाभार्थी सहभागी झाले होते. पाच हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या राष्ट्रीय महामार्ग योजनांच उद्घाटन तसंच एक हजार ७५६ कोटी रुपये खर्चून बिकानेर जिल्ह्यात बारसिंगसर इथ उभारण्यात येणाऱ्या सौरऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते झाली.