अमेरिका-चीन भौगोलिक तणावामुळे सोने व कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ
September 10, 2020 • महेश आनंदा लोंढे

मुंबई : जगात कोव्हिड-१९ चे रुग्ण वाढत असूनही कमोडिटीजचे दर मजबूत स्थितीत आहेत. पुरवठ्यासंबंधीच्या अडचणी असूनही जगभरातील अर्थव्यवस्था सुरु झाल्याने गुंतवणूकदार जोखीम घेण्यास तयार असल्याचे चित्र आहे. कोरोना संसर्गाचे प्रमाण सतत वाढत असल्याने वेगाने आर्थिक सुधारणेची आशा मावळत आहेत तसेच अमेरिका-चीनदरम्यानचा तणावही वाढतच असल्याने बुधवारी, स्पॉट गोल्डचे दर ०.८१ टक्क्यांनी वाढले व ते १९४६.७ डॉलर प्रति टनांवर स्थिरावले असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.

जगभरात कोव्हिड-१९ च्या वाढत्या प्रमाणामुळे बाजाराच्या भावनांवर परिणाम कायम आहे. साथीच्या आजाराचा जागतिक अर्थव्यवस्थेवरील व्यापक परिणाम झाल्याने सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याच्या मागणीतही वाढ झाली आहे. गुरुवारी संपणा-या दोन दिवसीय इसीबीच्या चलनधोरणाच्या बैठकीने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले आहे. कारण वाढत्या युरोबाबत आगामी काळात धोरणकर्त्यांचे काय भूमिका आहे, हे महत्त्वाचे आहे.

डब्ल्यूटीआय कच्च्या तेलात बुधवारी ३.५ टक्क्यांची वाढ झाली व ते दर ३८.१ डॉलर प्रति बॅरलवर बंद झाले. आधीच्या व्यापारी सत्रात झालेले मोठे नुकसान भरून काढत बाजाराने कच्च्या तेलाच्या जास्त विक्रीचे विश्लेषण केले. तथापि, घटलेल्या मागणीचा विचार करत ऑगस्ट २०२० महिन्यात कच्च्या तेलाचा मोठा निर्यातदार असलेल्या सौदी अरेबियाने आशियाई देशातील अधिकृत विक्री किंमत (ओएसपी) कमी केल्याने तेलाच्या किंमतीवर दबाव कायम राहिला. तेल बाजाराच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ओपेक आणि सदस्य संघटनांची बैठक येत्या १७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.

ओपेक+ ने वाढती मागणी लक्षात घेता, ऑगस्ट महिन्यापासून उत्पादनात दररोज ७.७ बॅरलपर्यंत कपात केली. जागतिक स्तरावरील आर्थिक घसरणीतून सावरण्यासाठी तेल बाजार संघर्ष करत आहे. मात्र साथीच्या आजाराच्या वाढत्या प्रमाणामुळे तेलाच्या बाजारपेठेबाबतचा दृष्टीकोन प्रभावित झाला. आर्थिक सुधारणांबाबत अनिश्चितता असल्याने जगातील तेलाच्या पुरवठ्यात वाढ होत आहे. मात्र वापर कमी होत आहे. त्यामुळे कच्च्या तेलावर दबाव कायम आहे.