आशियातल्या सर्वात मोठ्या, धारावी झोपडपट्टीची कोरोनामुक्तीकडे वाटचाल
July 11, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली : आशियातल्या सर्वात मोठ्या, दाटीवाटीच्या धारावी झोपडपट्टीनं आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. सुरुवातीला कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत आतापर्यंत एकूण २ हजार ३५९ कोरोनाबाधितांपैकी तब्बल १ हजार ९५२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्यानं आता तिथले फक्त १६६ रुग्ण उपचार घेत आहेत.

धारावीतला कोरोनाविरोधातला लढा यशस्वी ठरला आहे. विशेष म्हणजे धारावीत कोरोना रोखण्यासाठी केलेल्या कामाचा जागतिक आरोग्य संघटनेनं गौरव केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रायसस यांनी, ज्या देशांनी कोरोना नियंत्रणात उत्तम कामगिरी केली त्यांची उदहारणं देताना, धारावीतल्या एकात्मिक प्रयत्नांचा आवर्जुन उल्लेख केला आहे.

जागतिक महामारीच्या परिस्थितीत अशी राष्ट्रीय एकजुटीची, स्वयंशिस्तीची आणि जागतिक एकात्मिक प्रयत्नांची उदाहरणं आपल्याला साथीच्या प्रादुर्भावातून बाहेर पडण्यासाठी प्रेरणा देऊ शकतात अशा शब्दात, त्यांनी धारावीतल्या कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नांचं कौतूक केलं. 

धारावीनं कोरोना‍विरूद्धच्या लढ्यातलं रोल मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर आपलं नाव नोंदवलं अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, जागतिक आरोग्य संघटनेकडून झालेल्या कौतुकावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. या कौतुकामुळे कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ मिळालं, असंही त्यांनी म्हटलंय. धारावीच्या मोहिमेत ४७ हजार ५०० घरं तपासली.

साडेतीन लाख लोकांचं स्कॅनिंग केलं. कंटेनमेंट झोनमधल्या लोकांनी बाहेर जाऊ नये म्हणून त्यांना अन्नधान्याची २५ हजार पकिटं, तर २१ हजार जेवणाच्या पाकिटांचं वितरण मुंबई महानगरपालिकेनं केलं.

याशिवाय आमदार, खासदार आणि नगरसेवकांनीही या भागात मोफत अन्नधान्याचं वितरण केलं. या एकत्रित प्रयत्नांमुळे, धारावीत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं, असं मुंबई महापालिकेनं स्पष्ट केलं आहे.