कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या सामाजिक संस्था किंवा संघटनांच्या कर्मचाऱ्यांना, २५ लाख रुपयांचं विमा संरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
August 18, 2020 • महेश आनंदा लोंढे

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या सामाजिक संस्था किंवा संघटनांच्या कर्मचाऱ्यांना, २५ लाख रुपयांचं विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. यासंदर्भातला शासन निर्णय आज निर्गमित केला आहे, तसंच यासंदर्भात सर्व जिल्हा परिषदांनाही सूचना दिल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं. असं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊन त्यांचा मृत्यू झाला, तर त्यासाठी हे विमा संरक्षण लागू असेल.

यासाठी संबंधित संस्था तसंच संघटनेच्या कर्मचाऱ्यांची ग्रामपंचातीत नोंद असणं बंधनकारक असणार आहे. याशिवाय संबंधित कर्मचाऱ्याला कोरोनाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करावं लागलं, तर दाखल करण्याच्या किंवा त्याच्या मृत्यूच्या तारखेआधी १४ दिवसांच्या काळात तो कर्तव्यावर हजर असला पाहिजे अशी अटही या विमा संरक्षणासाठी असणार आहे.

सध्या याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत असेल, त्यानंतर परिस्थिती पाहून मुदत वाढवण्याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहितीही मुश्रीफ यांनी दिली.