गडचिरोली जिल्ह्यातल्या दुर्गम भागातल्या ७७७ कोटी रुपये किंमतीच्या पूल आणि रस्ते यांच्या कामाचं नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन
August 30, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्यातल्या दुर्गम भागातल्या ७७७ कोटी रुपये किंमतीच्या पूल आणि रस्ते यांच्या कामाचे उद्घाटन, तसेच भूमिपूजन केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सकाळी व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झाले. 

सिरोंचा जवळील प्राणहिता नदीवरील तसंच इंद्रावती नदीवरील पातागुडम इथल्या पूलांचे बेजरपल्ली-अहेरी रस्त्यावरील लंकाचेन इथला पूल आणि बेजूरपल्ली-देवलमरी-अहेरी रस्ता, गरंजी-पुस्टोला रस्ता दुरूस्ती या पूर्ण झालेल्या कामांचं उद्घाटन गडकरी आणि शिंदे यांच्या हस्ते झाले. तसेच पेरमिली, बांडिया, पर्लकोटा आणि वैनगंगा नदीवरील चार नवीन पुलांच्या कामाचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री व्ही के सिंग, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, खासदार अशोक नेते, डॉ.रामदास अंबटकर आदी व्हिडियो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

नागपुरात आपण ब्रॉडगेज मेट्रो आणली असून, हे काम गडचिरोली जिल्ह्यातील वडसा रेल्वेस्थानकापर्यंत वाढवणार आहोत. यामुळे अगदी तासाभरात नागपूरहून गडचिरोलीला पोहचता येईल. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेले २५ कोटी रुपये राज्य सरकारने द्यावे, अशी विनंती गडकरी यांनी एकनाथ शिंदे यांना यावेळी केली.