ज्येष्ठ रंगकर्मी लीलाधर कांबळी यांचं निधन
July 3, 2020 • महेश आनंदा लोंढे

मुंबई (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ रंगकर्मी लीलाधर कांबळी यांचं काल रात्री ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. गेली दोन वर्ष ते कर्करोगाशी झुंज देत होते.

कोकणातून उदरनिर्वाहासाठी मुंबईत आलेल्या चाकरमानी कांबळींनी मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरी करत असताना नाटकांत काम करण्याचा छंद जोपासला. मराठी रंगभूमीवर वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या मालवणी नाटकांच्या चमूचे ते प्रारंभापासूनचे घटक होते. वस्त्रहरण आणि केला तुका झाला माका या नाटकातल्या त्यांच्या भूमिका मालवणी भाषकेतर मराठी रसिकांनीही उचलून धरल्या. सुमारे ३० नाटकांमधून त्यांनी कामं केली. हसवाफसवी,वात्रट मेले, काचेचा चंद्र, हिमालयाची सावली, कस्तुरी मृग, प्रेमा तुझा रंग कसा, लेकुरे उदंड झाली या नाटकांमधल्या त्यांच्या भूमिका गाजल्या. नी थिंग कॉल्ड लव्ह या भरत दाभोळकर यांच्या इंग्रजी नाटकातही लीलाधर कांबळी यांनी काम केलं होतं. पडद्यामागच्या जबाबदाऱ्याही त्यांनी समर्थपणे पेलल्या. गोट्या, बे दुणे तीन, हसवणूक, कॉमेडी डॉट. कॉम, चला बनू करोडपती, गंगुबाई नॉन मॅट्रीक या टीव्ही मालिकांमधून ते घराघरात पोहचले होते.

अनेक चित्रपटांमधेही त्यांनी भूमिका केल्या. राज्य शासनाचा प्रभाकर पणशीकर पुरस्कार त्यांना मिळाला होता.कांबळी यांच्या निधनाबद्दल अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. कांबळी यांच्या निधनाने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा कलाकार कायमस्वरूपी गमावला असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.