दुषित पाणी पुरवठ्यामुळे उलट्या व जुलाबाच्या तक्रारी वाढ
July 7, 2020 • महेश आनंदा लोंढे

"अशुध्द पाण्याचा प्रश्न" महानगरपालिकेला महत्वाचा वाटत नाही का ? माजी नगरसेवक तानाजी खाडे यांचा सवाल

पिंपरी: निगडी मधील सेक्टर नंबर २२ डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अशुध्द पाण्याचा पुरवठा होत आहे. येथील रहिवाश्यांची प्रकृती खराब होत असून, उलट्या व जुलाबाच्या तक्रारी वाढत आहेत. दुषित पाणी पुरवठ्यामुळे रहिवाश्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. सध्या कोरोना या विषाणूमुळे जनता भयभीत झाली आहे. अश्या परिस्थितीत तात्काळ शुद्ध पाणी पुरवठा करावा, अशी मागणी पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक तानाजी खाडे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत तानाजी खाडे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, या परिसरात दाट लोकवस्ती आहे. गेल्या अनेक दिवसांपासून येथे अशुद्ध पाणीपुरवठा तसेच पाण्याची दुर्गंधी येत आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत आहे. पोटदुखीचे उलट्या व जुलाबाचे आजार वाढले आहेत. याबाबत स्थानिक नागरी, सामाजिक कार्यकर्ते यांनी वेळोवेळी तक्रारी देऊन देखील प्रशासनाकडून योग्य ती दखल घेतली गेलेली नाही. संबधित अधिकारीवर्गाकडून उडवा-उडवीची उत्तरे दिली जातआहेत .

वेळोवेळी पाण्याच्या टाकीचीही स्वच्छता करणे व जलवाहिन्यांना कुठे गळती आहे का ? त्याची तपासणी करण्यात यावी. दिवसेंदिवस से.२२ मधील विवीध ठिकाणच्या तक्रारी येऊन देखील महापालिका प्रशासनाला "अशुध्द पाण्याचा प्रश्न" हा महत्वाचा वाटत नाही का ? जनतेला शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा होण्यासाठी पाण्याची गुणवत्ता चांगली असणे आवश्यक आहे. शहरातील जनतेला शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा करणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे से.२२ ला तातडीने शुद्ध पाणीपुरवठा सुरु करावा, अन्यथा महापालिकेच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तानाजी खाडे यांनी दिला आहे.