देशातली कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १६ लाखाहून अधिक
August 23, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या प्रयत्नामुळे हे शक्य झालं असल्याचंही आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. या प्रयत्नांमळेच देशाचा रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ७५ टक्क्यांवर गेला आहे. गेल्या चोवीस तासात जवळजवळ ५८ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले असून देशात रुग्ण बरे होण्याचा आकडा २२ लाख ८० हजारावर पोहोचला आहे.

देशात कोविड रूग्णांच्या संख्येनं ३० लाखांचा आकडा पार केला आहे. गेल्या चोवीस तासांत, देशात ६९ हजार २३९ नवीन रूग्ण सापडले आहेत. तर ९१२ जण कोविडनं मृत्युमुखी पडले असून, एकूण बळींची संख्या ५६ हजार ७०६ इतकी झाली आहे.

जानेवारी महिन्यात केवळ पुण्यातल्या एका प्रयोगशाळेत कोरोनाचाचणी होत होती तर आज देशात ३ कोटी ५० लाख चाचण्या झाल्या असल्याचंही आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात दर १० लाख लोकांमागे २५ हजार ५७४ चाचण्या होत आहेत. सध्या देशात ९८३ सरकारी तर ५३२ खाजगी प्रयोगशाळा कार्यरत असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे.