देशातल्या महामार्ग प्रकल्पांमध्ये चीनी कंपन्यांना सहभागी होऊ देणार नसल्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा
July 1, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या भागीदारी प्रकल्पांसह कुठल्याही महामार्ग प्रकल्पामध्ये चिनी कंपन्यांना सहभागी होण्याची परवानगी दिली जाणार नाही, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. लडाखमध्ये भारत आणि चीन दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर  ते आज पीटीआय  वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. 

देशातल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसह कुठल्याही क्षेत्रात चिनी कंपन्यांना प्रवेश मिळणार नाही, याकडे  सरकार विशेष लक्ष देणार असून, आत्मनिर्भरतेच्या दिशेनं हे एक पाऊल असल्याचं ते म्हणाले.  

देशातल्या महामार्ग प्रकल्पांमध्ये  चिनी कंपन्यांना प्रतिबंध करण्यासाठी, तसंच भारतीय कंपन्यांसाठी पात्रतेच्या निकषांमध्ये शिथिलता आणण्यासाठीचं धोरण लवकरच  जारी केलं जाईल, असं ते म्हणाले.  

तंत्रज्ञान, सल्ला आणि अन्य क्षेत्रांमध्ये परदेशी कंपन्यांबरोबर भागीदारी करताना त्यामध्ये चिनी कंपन्यांचा समावेश केला जाणार नाही, तसंच स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन आणि  चीन वगळता अन्य देशांमधल्या परदेशी गुंतवणुकीला चालना दिली जाईल, असं गडकरी यांनी सांगितलं.