पंतप्रधान यांच्या हस्ते करण्यात येणार ७५ रुपये मूल्य असलेल्या एका विशेष नाण्याचं प्रकाशन
October 14, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- संयुक्त राष्ट्रांतर्फे एक महत्त्वाकांक्षी उपक्रम म्हणून चालविण्यात येणारी अन्न आणि कृषी संघटना अर्थात एफ. ए. ओ. यंदा येत्या १६ तारखेला ७५ वर्षं पूर्ण करीत आहे. त्यानिमित्त येत्या शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७५ रुपये मूल्य असलेल्या एका विशेष नाण्याचं प्रकाशन करण्यात येणार आहे. जगभरातील गरीब, दुबळ्या, आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील आणि दोन वेळेच्या पोटभर अन्नाचीही भ्रांत असणाऱ्या करोडो लोकांसाठी संघटनेनं  केलेलं कार्य अतुलनीय असून भारताचं या संघटनेबरोबरचे नाते जुने आणि दृढ आहे. भूक आणि कुपोषणमुक्त भारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध असलेला भारत कृषी आणि पोषण या बाबींना सर्वाधिक प्राधान्य देतो, हे अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न आहे, असं भारतानं म्हटलं आहे.