पोलिसांचे कार्य आणि जनतेचे कर्तव्य दर्शविणाऱ्या ‘घरात रहा’ या जनजागृतीपर गीताचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते अनावरण
July 27, 2020 • महेश आनंदा लोंढे

गीताद्वारे जनजागृतीचा योग्य परिणाम साधला जाईल- गृहमंत्र्यांचा विश्वास

मुंबई : सध्या सुरू असलेल्या ‘कोरोना’विरुद्धच्या युद्धात जनजागृतीसाठी ‘घरात रहा’ हे  पोलिसांचे कार्य आणि जनतेचे कर्तव्य दर्शवणारे यथायोग्य  गीत आहे. यामुळे  राज्यात जनजागृती होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.

‘घरात रहा’ या जनजागृती पर गाण्याचे विमोचन आज मंत्रालयात  श्री. देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले.या वेळी सुप्रसिद्ध कलावंत उषा नाडकर्णी, दिग्दर्शक राहुल खंडारे, गीतकार राजेंद्र काणे उपस्थित होते.

सुश्राव्य संगीत नियोजन योग्य चित्रीकरण व समर्पक संदेश याचे सुरेख मिश्रण असलेले हे गीत आहे. राज्यातील पोलिस करीत असलेली कामे आणि लॉकडाऊनच्या काळातील नागरिकांचे कर्तव्य या गीताद्वारे सांगितले आहे.

सिनेक्षेत्रातील आघाडीचे कलावंत या गीतातून जनतेला “घरात रहा” सुरक्षित रहा असा संदेश देत आहेत. त्यामुळे याद्वारे जनजागृतीचा योग्य परिणाम साधला जाईल असा विश्वास गृहमंत्र्यांनी याप्रसंगी व्यक्त केला व सर्व टीमचे अभिनंदन केले.

या गीताची निर्मिती संकल्पना व गीतकार विलेपार्ले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे हे आहेत. त्यांचेही कौतुक गृहमंत्र्यांनी यावेळी केले.

या गाण्याचे दिग्दर्शक राहुल देविदास खंडारे ( स्लमडॉग मिलेनियर फेम ) असून संगीत निहीर शेंबेकर यांचे आहे. तर शंकर महादेवन यांनी हे गायले आहे. मिक्स मास्टर सिद्धार्थ महादेवन.  यात शंकर महादेवन, विद्या बालन, सचिन खेडेकर, सुमित राघवन, उषा नाडकर्णी, दिलीप जोशी(जेठालाल),शर्मिष्ठा राऊत, पुष्कर जोग यांनी जनजागृतीचा संदेश दिला आहे.