बॉलिवूडच्या ‘नृत्यगुरू’ हरपल्या- सांस्कृतिक कार्यमंत्री
July 3, 2020 • महेश आनंदा लोंढे

मुंबई : अनेक प्रसिद्ध गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन करून चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सरोज खान यांच्या निधनामुळे बॉलिवूडचा नृत्यगुरू हरपला आहे, या शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी  आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

प्रारंभीच्या काळात चित्रपटात नृत्यदिग्दर्शनासाठी जिथे फक्त पुरुष नृत्य दिग्दर्शकाचा विचार केला जायचा, त्या काळात सरोज खान यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचे नाव कमावले.  त्यांच्यामुळेच आज वेगवेगळ्या चित्रपट पुरस्कारांमध्ये नृत्यदिग्दर्शकालाही त्याच्या कामासाठी नावाजले जाऊ लागले. मिस्टर इंडिया, चांदणी, बेटा,  तेजाब, नगीना, डर, बाजीगर, अंजाम, मोहरा, याराना, दिलवाले दुल्हनिया, परदेश, देवदास, लगान, सोल्जर, ताल, फिजा, साथिया, स्वदेश, कुछ ना कहो, वीर जारा, डॉन, फना, गुरू, नमस्ते लंडन, जब वी मेट, एजंट विनोद, राउडी राठौर, एबीसीडी, तनु वेड्स मनु रिटर्न्स, मनकर्णिका, कलंक आदी चित्रपटांसाठी त्यांनी केलेले  नृत्यदिग्दर्शन आपल्या सर्वांच्या मनात कायम लक्षात राहील. सरोज खान यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ मिळो, असेही श्री. देशमुख यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.