भारत चीन सीमेवरच्या गलवान खोऱ्यातून चिनी सैनिकांनी माघार घ्यायला सुरुवात
July 6, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत चीन सीमेवरच्या गलवान खोऱ्यातून चिनी सैनिकांनी माघार घेण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही बाजूच्या सैन्यदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या करारानुसार सैन्य मागे जात असून, तंबू तसंच इतर साहित्यही चिनी सैनिक काढून परत नेत असल्याचं दिसून येत आहे, असं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

गलवान आणि गोग्राच्या भागातून चीनी सैन्याच्या गाड्या माघारी फिरत असल्याचे दिसून येतं आहे. सुमारे १ किलोमीटर भर चीनी सैन्य माघारी गेलं असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. मात्र चीनी सैन्य नेमकं किती मागे गेलं, यासंदर्भात पडताळणी केल्यावरचं काही सांगता येईल, असं सैन्यातल्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं या बातमीत म्हटलं आहे. पँगाँग त्सो भागातही चीनी सैन्याने माघार घेतली किंवा नाही हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही.