महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ‘डिजिटल ८ अ‘ सुविधेचा ऑनलाईन शुभारंभ
August 1, 2020 • महेश आनंदा लोंढे

मुंबई : महसूल दिनाच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागामार्फत आजपासून ‘डिजिटल ८ अ‘ ऑनलाईन सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ‘डिजिटल ८ अ‘सुविधेचा ऑनलाईन शुभारंभ  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आज करण्यात आला.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ऑनलाईन शुभारंभ केल्यानंतर सर्वांना महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच उपस्थित महसूल विभागातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

श्री. थोरात यावेळी म्हणाले, शासकीय कामात महसूल विभागाची महत्त्वाची भूमिका आहे आणि म्हणूनच या विभागाला प्रशासनाचा कणा असे म्हणतात. महाराष्ट्राच्या विकासात आजपर्यंत या विभागाने महत्त्वाचे योगदान दिले असून यापुढील काळातही हा विभाग सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबविण्यात पुढे राहील असा विश्वास आहे. गेला ४ महिन्यापेक्षा अधिकचा काळ आपण सर्व कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी काम करीत आहोत, या काळात राज्यातील महसूल यंत्रणा सक्षमपणे काम करीत होती याचा मला अभिमान वाटतो.

सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख, शांती आणणारा हा विभाग आहे. त्यामुळेच अनेक जबाबदाऱ्या महसूल विभागावर सोपविण्यात येतात. आजपर्यंत साडेसतरा लाखांहून अधिक लोकांनी ‘डिजिटल  ७/१२‘ घेतला आहे त्याचप्रमाणे आता ‘डिजिटल ८ अ‘ ला सुद्धा असाच प्रतिसाद मिळेल अशी मला आशा आहे.  महसूल प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न करूया असेही आवाहन श्री. थोरात यांनी केले.