युपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर
August 4, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय लोकसेवा आयोगानं, नागरी सेवा परीक्षा २०१९ चे अंतिम निकाल आज जाहीर केले. नागरी सेवांच्या एकूण ९२७ पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. निकालानंतर भारतीय प्रशासकीय, परराष्ट्र व्यवहार, आणि भारतीय पोलीस सेवेतल्या  विविध पदांसाठी एकूण ८२९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

या निकालात मुलांमधे प्रदीप सिंग यानं, तर मुलींमधे प्रतिभा वर्मा हीनं पहिला क्रमांक पटकावला आहे. हा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल. निकाल जाहीर झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांनंतर गुण जाहीर केले जातील अशी माहिती केंद्रीय लोकसेवा आयोगानं दिली आहे.