राज्यात आज सर्वत्र गणरायाचं आगमन
August 22, 2020 • महेश आनंदा लोंढे

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आज सर्वत्र गणरायाचं आगमन झालं. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हा उत्सव, लोकांच्या मनात चैतन्य आणि आनंद फुलवत राहील असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. 

मुंबईत जवळपास सव्वा लाख घरगुती आणि दहा हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणरायाच्या छोट्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली. यंदा कोरोनाच्या पार्शवभूमीवर सार्वजनिक मंडळांनी साध्या पद्धतीनं उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

आज सकाळी मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला आणि महापौर बंगला इथं देखील गणपतीमूर्तीची प्रतिष्ठापना झाली. सुमारे 5 हजार सीसी कॅमेऱ्यांच्या माध्यमातून उत्सवांवर नजर ठेवली जाणार आहे. मुंबईत उत्सवासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. 

पुण्यात मानाच्या पहिला कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना आज सकाळी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख हेमंत रासने यांच्या हस्ते करण्यात आली. तर पारंपरिक लाकडी पालखीतून केसरी वाड्याच्या गणपतीचं तसंच इतरही प्रमुख गणपतींचं आगमन झालं. घरोघरीही विधीवत पण साधेपणानं श्री गणेशांची प्राणप्रतिष्ठापना केली जात आहे.

नवी मुंबईत यंदा केवळ ८४ गणेश मंडळांना मंडप उभारण्यासाठी परवानगी मिळाली आहे. गेल्या वर्षी हाच आकडा १९३ होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहाटे ३ पासून घरगुती गणेश मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. धुळे तसंच सातारा जिल्ह्यातही ढोल-ताशाच्या गजरात गणरायाचं आगमन झालं.