शहरातील कोविड-१९ रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी इम्युनिटी ज्यूस
August 20, 2020 • महेश आनंदा लोंढे

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग व फैलाव लक्षात घेता विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. शहरातील कोविड-१९ रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशन व ग्लोबल इंडिया फांऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आलेले डाबर कंपनीचे इम्युनिटी ज्युस महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांमध्ये मोफत देण्यात येणार असल्याची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील आदी उपस्थित होते.

मा.आ.सुभाष देशमुख (माजी सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री) यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या सोलापूर सोशल फाऊंडेशन तसेच भारतभर सामाजिक कार्यात अग्रेसर ग्लोबल इंडिया फाऊंडेशन संस्थेंकडून महापालिकेस कोविड-१९ रुग्णांची इम्युनिटी वाढविण्यासाठी डाबर कंपनीचे आवळा, मोसंबी, संत्रे अशा विविध पद्धतीचे १० टन इम्युनिटी ज्युस मोफत दिले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसें दिवस वाढत आहे. त्यादृष्टीने महापालिकेकडून विविध पातळयांवर नियोजन व व्यवस्थापन करण्यात येत असल्याची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेता नामदेव ढाके यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.