शेताच्या बांधावरुन महिला शेतकऱ्यांचा ऑनलाईन प्रशिक्षणात सहभाग
July 4, 2020 • महेश आनंदा लोंढे

सुमारे दीड लाख महिला शेतकरी झाल्या ‘डिजिटली कनेक्ट’

शेतीपूरक व्यवसाय, ऑनलाईन प्रशिक्षणे, ई – कॉमर्सवर भर देण्याचा निर्धार

मुंबई : राज्याच्या विविध भागातून आज महिला शेतकरी एका प्रशिक्षणात मोबाईलवरुन सहभागी झाल्या होत्या. महिला शेतकऱ्यांसाठी प्रथमच आयोजित या ऑनलाईन प्रशिक्षणात अनेक महिला शेतकरी त्यांच्या बांधावर एकत्र जमून सहभागी झाल्या होत्या. उमेद अभियानामार्फत कृषी संजिवनी सप्ताहानिमित्त आयोजित या ऑनलाईन प्रशिक्षणात राज्यातील सुमारे दीड लाख महिला शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सेंद्रीय शेती, गट शेती, शेळी पालन, मत्स्य व्यवसाय यांसारखे शेतीपुरक व्यवसाय, शेतीउत्पादने तसेच बचतगटांच्या उत्पादनांची ऑनलाईन विक्री अशा विविध विषयांच्या अनुषंगाने प्रशिक्षणामध्ये माहिती देण्यात आली.

महिला शेतकऱ्यांसाठी प्रथमच ऑनलाईन प्रशिक्षणाचा हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. खरीपाची कामे सध्या सुरु आहेत. यासंदर्भात प्रशिक्षण देण्याबरोबरच या महिला शेतकऱ्यांना ऑनलाईन तंत्रज्ञानाचीही माहिती व्हावी हा या प्रशिक्षणाचा उद्देश होता. यास राज्यातील महिला शेतकऱ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. प्रशिक्षणात राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी ऑनलाईन येऊन सर्व महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत त्यांच्या उत्साह द्वीगुणीत केला.

याशिवाय राज्याच्या ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंदकुमार, कृषी आयुक्त सुहास दिवसे, उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, उपसंचालक दादाभाऊ गुंजाळ यांनी महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मालेगाव तालुक्यातील (जि. वाशिम) प्रिया पाठक, रेणापूर तालुक्यातील (जि. लातूर) राधा फड, बार्शी तालुक्यातील (जि. सोलापूर) वैशाली आवारे, परंडा तालुक्यातील (जि. उस्मानाबाद) नंदा जगताप यांच्यासह राज्याच्या विविध भागातील कृषी सखी, पशु सखी, मत्स्य सखी आणि महिला शेतकऱ्यांनीही प्रशिक्षणात संवाद साधला.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, उमेद अभियानामार्फत महिला बचतगटांची चळवळ प्रभावीपणे राबविली जात आहे. याबरोबरच महिला शेतकऱ्यांना विविध प्रशिक्षणे देऊन त्यांचे सक्षमीकरण केले जात आहे. यापुढील काळातही या उपक्रमास ग्रामविकास विभागामार्फत पाठबळ दिले जाईल. बचतगटांची काही उत्पादने ॲमेझॉनसारख्या ई-कॉमर्स वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहेत. आता याबरोबरच महिला शेतकऱ्यांची उत्पादने, कोल्हापुरी चपला, पैठणी साड्या यांसारख्या स्थानिक उत्पादनांनाही ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करुन देऊ, असे त्यांनी सांगितले.

कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी ऑनलाईन प्रशिक्षणाच्या या उपक्रमाचे कौतूक केले. ते म्हणाले की, महिला शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणावर आता कृषी विभागामार्फतही भर देण्यात येईल. शेती शाळा उपक्रमातील प्रशिक्षणापैकी सुरुवातीला २५ टक्के आणि नंतर ५० टक्के प्रशिक्षणे ही खास महिला शेतकऱ्यांसाठी आयोजित केली जातील. याशिवाय फार्मर प्रोड्युसर कंपन्यांमध्येही महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देऊ. सातबारा उताऱ्यावरही महिला शेतकऱ्यांच्या नावाचा समावेश व्हावा, तसेच कृषी विभागाच्या योजनांचा त्यांना लाभ मिळावा यासाठी कार्य करु, असे त्यांनी सांगितले.

ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंदकुमार यांनी बदलत्या काळानुसार आता ऑनलाईन तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याचे आवाहन केले. ॲमेझॉनसारख्या ई-कॉमर्स संकेतस्थळावर प्रत्येक जिल्ह्यातील बचतगटांची उत्पादने असली पाहिजेत. महिलांनी आता या ऑनलाईन दुकानांवर आपली उत्पादने विकली पाहिजेत. महिलांना याची माहिती होण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत आता ई-कॉमर्स संदर्भात महिलांना प्रशिक्षणे दिली जातील, असे त्यांनी सांगितले.

उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आर. विमला यांनी सादरीकरण केले. त्या म्हणाल्या की, राज्यात सुमारे साडेचौदा लाख महिला शेतकरी उमेद अभियानाशी जोडल्या गेल्या आहेत. अभियानामार्फत कृषी सखी, पशु सखी, मत्स्य सखी यांच्यामार्फत महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्यात येत आहे. शेतीशिवाय पुरक व्यवसायांचेही त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

कृषी आयुक्त सुहास दिवसे म्हणाले की, आता अन्नसुरक्षेबरोबर सुरक्षित अन्नाचीही गरज वाढत आहे. लोकांना रसायनमुक्त सुरक्षित अन्न पाहिजे आहे. यासाठी ते चांगला दर द्यायला तयार आहेत. यामुळे येत्या काळात सेंद्रीय शेतीची चळवळ व्यापक होणे गरजेचे आहे. कृषी विभाग आणि उमेद अभियान यासाठी एकत्र काम करेल, असे ते म्हणाले.  

उपसंचालक दादाभाऊ गुंजाळ यांनी उमेद अभियानामार्फत महिला शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पार्थ नॉलेज नेटवर्क यांच्यामार्फत या ऑनलाईन प्रशिक्षणाचे प्रसारण करण्यात आले.